**पाणी हेच जीवन??!!**
पाणी हे जीवन, भरपूर पाणी प्या, पाणी पचायला फार कष्ट नसतात म्हणून जास्त पाण्याने फार त्रास होतं नाही अशी वाक्ये सगळ्यांच्या कानावर पडत असतील. ‘Hydrated’ राहणे हे एक चकचकीत ‘Fitness’ ब्रीद वाक्य झाले आहे. आता तर applications निघाली आहेत पाणी पिण्याची आठवण करण्यासाठी. कामात बुडून जाऊन पाणी पिण्याकडे दुर्लक्ष होऊ नये ह्यासाठी काळजी घेतली पाहिजे. तहान लागणे हा एक नैसर्गिक वेग आहे तो अडवायचा पण नाही, आणि तहान नसताना उगाच पाणी ही प्यायचे नाही.
सकाळी पाणी प्यायची फॅशन पण तशी जुनीच. त्या बाबतीत सगळ्यात जास्त घोळ हा किती पाणी प्यावे ह्या प्रकारावर घातला जातो. सगळ्यात सोपे हेच आहे की तहान लागली की पाणी प्यावे.
काही साध्या सोप्या पाण्याच्या रेसिपीज बघुया:
१. उकळून आटवलेले पाणी: पाणी उकळून १/२, १/४, किंवा १/८ केले की ते अधिकाधिक हलके होत जाते. साधारण पणे चांगली भूक लागत नसता, वजन कमी करायचे असल्यास, वारंवार कफाचे, सर्दीचे त्रास होत असतील तर अशा पद्धतीने आटवलेल्या पाण्याचा खूप छान उपयोग होतो.
२. धने – जिरे पाणी: लघवी संबंधित आजार, उन्हाळे लागणे, भूक कमी व वजन जास्त असणे अशा परिस्थितीत ह्या पाण्याचा चांगला उपयोग होतो. १ लिटर पाण्याला उकळी आली की १-१ चमचा प्रत्येकी धने आणि जिरे थोडे ठेचून टाकावे आणि पाण्याचा रंग बदले पर्यंत साधारण २-३ मिनिटेच उकळावे. दिवसभर हेच पाणी गाळून प्यावे. अशा पद्धतीने बनवलेले पाणी उष्ण ही पडत नाही आणि उत्तम काम करते.
३. सिद्ध जल: औषधी वनस्पती वापरून उकळून अटवलेले पाणी बरेचदा ताप, तहान, दाह असता दिले जाते. नागरमोथा, वाळा, चंदन, पित्तपापडा अशा काही वनस्पती वापरून हे वैद्यांच्या सल्ल्याने घेतले असता तापात होणारी तहान तहान, तलखी कमी व्हायला मदत होते व त्या पाण्याने पोट डब्ब देखील होत नाही.
४. फांट: ह्याबाबत तुमचे आयुर्वेद वैद्य तुम्हाला जास्त चांगले सांगू शकतील. औषधी वनस्पती चूर्णवर कडकडीत पाणी टाकून थोडा वेळ ठेवून वरील पाणी ह्यात वापरले जाते. उडनशील द्रव्ये असणाऱ्या वनस्पतीचा अशा पद्धतीने वापर केला तर जास्त चांगला उपयोग दिसतो.
प्रकृतीप्रमाणे पाण्याची गरज बदलते. उन्हाळा, हिवाळा, जिथे राहतो तेथील हवामान ह्याने पण पाण्याच्या गरजेत फरक पडतो.पण त्यातही जर तुम्हाला पूर्वी ‘क्ष’ लिटर पाण्याची तहान असेल आणि त्याच वातावरणात समान हालचाली असताना ‘य'(क्ष<य) लिटर तहान सतत लागायला लागली तर मात्र ते कदाचित तुमच्या शरीरात वाढलेल्या अनावश्यक उष्णतेचे प्रतीक असू शकते. काही दिवस त्याकडे लक्ष ठेवून, बाकी होणारी लक्षणे बघून मग त्यावर उपाय योजना केलेली उत्तम.
साधारणपणे खोलीच्या तापमानाचे(रूम टेंपरेचर) पाणी आपण पितो. त्यामागे साधे कारण असे आहे की,आपल्यासारख्या देशात साधारण तापमान २५-३५ डिग्री सेल्सिअस असते. शरीराचे तापमान पण साधारण तेव्हढेच म्हणून ते बरोबर होते.पण जेव्हा बाहेरील तापमान खूप कमी (१०-२० डिग्री सेल्सिअस) असते तेव्हा त्या तापमानाचे थंड झालेले पाणी पचवायला शरीराला जास्त कष्ट पडतात. त्यामुळे तेव्हा थोडे कोमट पाणी पिणे हितकर. तसेच समीकरण उन्हाळ्या बाबतीत पण. ग्रीष्म ऋतूत माठातले किंवा वाळा घालून थंड गुणाचे झालेले पाणी पिणे हितकर ठरते. सतत गरम पाणी पिणे हे पण त्रासदायकच. घशातील आणि तोंडातील प्राकृत कफाचा क्षय होऊन खवखव, कोरडा खोकला, तोंडाला कोरडेपणा , आम्लपित्त सारखी लक्षणे दिसू शकतात. ह्या कोरोना काळात सतत गरम पाणी उगाचच जे पितात त्यांच्यासाठी ही वि.सू.
ताप, सर्दी, खोकला ह्यासारख्या पचनशक्ती कमी झालेल्या आणि कफ वाढलेल्या रोगात उकाडा असेल तर उकळवून, आटवून, हलके केलेले, पण थंड झालेले असे पाणी द्यावे. ह्याच रोगात थंडी किंवा पावसाळा असता गरम गरम पाणी, आले गवतीचहाचा काढा हे प्यावे. ह्या सगळ्या विचारात तारतम्य आहे फक्त. थोडासा विचार केला तर ह्या गोष्टी आपण सुद्धा ठरवू शकतो.
पाणी अति पिण्याने सूज येणे (मूत्र पिंडावर ताण येऊन), संडासला पातळ होणे, अग्निमांद्य होते. कमी प्यायले किंवा तहान लागली असता पाणी न प्यायल्याने अंग गळून जाणे, संज्ञा नष्ट होणे, चक्कर व हृदय अवयवाला त्रास होतो. म्हणजेच जास्त पाणी काय किंवा कमी काय दोन्ही त्रासदायकच. ह्या सगळ्याचा सारांश एवढाच की शरीराच्या गरजेप्रमाणे वागा. एकच प्रमाण सगळ्यांना लागू होत नाही आणि तसा प्रयत्न करणे पण चुकीचेच.
{ता.क. गरम पाण्याचे गुण: दीपन, पाचन, बस्तीशोधक ताप, दमा, खोकला, कफविकार ह्यामध्ये हितकर. थंड पाण्याचे गुण: ग्लानी, मूर्च्छा, उलटी, चक्कर, तहान, दाह ह्यांना कमी करणारे. अग्नी मंद असेल पण अंगात दाह इत्यादी लक्षणे असतील तर उकळवून गार केलेले पाणी हा चांगला पर्याय बऱ्याच लोकात ठरतो. ते पचायला हलके आणि पित्त वात तसेच कफाच्या आजारात देणे योग्य ठरते. १/८,१/४, किंवा १/२ आटवलेले पाणी त्याच्या त्या दिवशी प्यावे.}
©वैद्य स्वराली शेंड्ये यशप्रभा आयुर्वेद