थंडीमध्ये जपा प्रकृती

थंडीमध्ये जपा प्रकृती(आहार मार्गदर्शन)

सिडनी कर तसे गेले काही आठवडे थंडीचा अनुभव घेत आहेत पण एक जून पासून थंडीचा प्रत्यक्ष ऋतू सुरू झाला.

पहाटे पहाटे दुलई पांघरून झोपावे अशी थंडी असते.उठल्या उठल्या कडकडून भूक लागलेली असते, पण उठवत तर नाही.कसं बसं उठून फक्कडसा आल्याचा चहा प्यायला की जर कामे सुचू लागतात नाही का!!मूळात थंडीमध्ये प्रकृती तशी उत्तम असते.आजारी कमी पडतो, ताजेतवाने वाटते, प्रवासाला जायचे बेत ठरतात.अग्नी हा उत्तम असतो.त्यामुळे खाल्ले ते पचले अशी अवस्था असते.म्हणूनच भरपूर गोड आणि स्नेह पदार्थ(तूप, तेल) घालून केलेला फराळ खाण्याचा सण दिवाळी हा सुद्धा थंडीतच येतो.

आता सर्वांचा लाडका विषय :’खाणे’ ह्याकडे वळूया.जर तुमची प्रकृती चांगली असेल तर खादाडी करायला थंडी हा उत्तम ऋतू आहे.अपथ्यकर खाणे पण चांगल्या रीतीने ह्याच ऋतूत पचू शकते. रात्रीच्या वेळी मस्त गरम गरम  barbeque केलेल्या भाज्या, मांस इत्यादी खावे.non veg खाण्यासाठी उत्तम ऋतू.

*न्याहरी: इतर ऋतूंमध्ये न्याहरी केलीच पाहिजे असा नियम आयुर्वेदाप्रमाणे नाही, थंडीमध्ये मात्र उठल्या उठल्या भरपेट नाश्ता करावा असा संकेत आहे.न्याहारीसाठी घावन, भाजणी, थालीपीठ, पोहे ,उपमा, उडीद वडा सांबार, तूप मेतकूट भात, पराठा इत्यादी पदार्थ खाऊ शकता.बाजरीच्या भाकरीचा गूळ तूप वेलची पावडर घालून केलेला खमंग लाडू अतिशय रुचकर लागतो त्याचाही समावेश करावा. तिखट पदार्थांबरोबर थोडा सुकामेवा (काजू, बदाम, पिस्ता,खजूर), एखादा पीठांपासून बनवलेला पौष्टिक लाडू, खायला हरकत नाही.कधीतरी मिसळ किंवा पुरी भाजी सारखे चमचमीत पदार्थ खायला हरकत नाही.झणझणीत तर्रीच्या भुरक्याने थंडी कुठल्याकुठे पळून जाईल.(पण प्रकृतीला सांभाळून कधीतरीच.)नंतर छानसे गरम गरम दूध शतावरी कल्प घालून प्यावे.काही लोकांना नाश्त्यानंतर चहा प्यायची सवय असते.थंडीत सतत चहा प्यावासा वाटतो, जो प्रकृतीला फारसा चांगला नाही, म्हणून एक सोपा हर्बल काढा करता येतो.1 कप पाणी, ½ चमचा किसलेले आले आणि 1 गवतीचहाची पात उकळत ठेवावी.ह्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार जेष्ठमध, मिरी, तुळस टाकू शकता.3-4 मिनिटे उकळल्यावर आवडीप्रमाणे साखर घालावी आणि दूध घालून मस्तपैकी हा काढा प्यावा.चहाची गरज भासत नाही.तुळस मध्ये उडनशील तेल असते त्यामुळे तुळस ही नेहमी काढ्यात शेवटी टाकावी आणि मग गॅस बंद करून झाकण ठेवावे म्हणजे ती उडनशील द्रव्ये उडून जात नाहीत.आल्यासारखे उष्ण पदार्थ असल्याने थंडीत होणाऱ्या त्रासाची पातळी पण कमी होते. फळे दिवसा व त्या ऋतुमधीलच खावीत.जेवणानंतर खाऊ नये.

*जेवण: अगदी पूर्ण जेवण करावे.खीर, गाजर हलवा, शिरा असे गोड पदार्थ आहारात घ्यायला हरकत नाही.डाएट मुळे जर फक्त भाकरी खात असाल तर ज्वारीचीच खाल्लेली चांगली.नाचणी व बाजरी रुक्ष किंवा कोरड्या असल्याने त्या थंडीसाठी योग्य नाहीत.खायची झाल्यास तीळ लावून आणि भरपूर तूप घालून खावी.बाजरी गूळ आणि खजूर घालून केलेले रोट पण खमंग लागतात.त्याचाही समावेश करावा.आहारात तूप भरपूर असावे.भाजीला लसूण आले घालावे.शेंगदाणा कुटासारख्या जास्त उष्मांक असणाऱ्या पदार्थांचा समावेश असावा.वयस्कर माणसांनी, शिक्षकांनी, गायकांनी शक्यतो कोमट पाणीच प्यावे.ज्यूस किंवा रसांपेक्षा सूप चा अवश्य समावेश करावा.ह्या सुप्स मध्ये आले लसूण मिरपूड घालावी.ताक प्यायची सवय असल्यास तूप जिऱ्याची फोडणी देऊन प्यावे, थोडेसे आले किसून मठ्ठा बनवून प्यायले तरी चालेल.नुसत्या ताकाने शरीरात थंडावा वाढतो आणि संधिवात किंवा अग्नी कमी असणाऱ्या माणसांना त्याचा त्रास होऊ शकतो.दही शक्यतो टाळावेत.कफाचे आणि पित्ताचे दोन्ही त्रास होण्याची शक्यता असते.

थंडीच्या दिवसात दुपारी 4 वाजता सुद्धा काहीतरी अवश्य खावे.एखादे घावन, थालीपीठ, उपमा, डोसा असे खायला हरकत नाही.शेंगदाणा, नारळ, जवस, कारळे, तीळ अशा तैलमय पदार्थांचा वापर वाढवावा.रात्रीचे जेवण नेहमीसारखेच असावे.गोड पदार्थाचा समावेश नको.भात मात्र दोन्ही जेवणात अवश्य असावा.

थोडक्यात काय स्वस्थ राहा, भरपूर खा आणि भरपूर पचवा, पण प्रकृतीला सांभाळूनच.

©️वैद्य स्वराली शेंडये

थंडीमध्ये जपा प्रकृती (विहार)

थंडीमध्ये गरम गरम पांघरुणातून बाहेर पडायला अगदी नको वाटते.पण खरे तर थोडा मनाला समजावून बाहेर व्यायाम करायला गेलो तर अतिशय ताजेतवाने वाटते.थंडी हा ऋतूच मुळी व्यायामासाठी एकदम योग्य आहे.सूर्यनमस्कार, योगासने, धावणे, दोरीवरच्या उड्या, dumbells, cross fit असे विविध व्यायाम प्रकार करावे. व्यायामाला बाहेर जाणार असाल तर कान व डोके टोपीने झाकलेले असावे.आयुर्वेदानुसार थंडीमध्ये अर्धशक्ती व्यायाम करावा असा संकेत आहे.अर्धशक्ती व्यायाम म्हणजे नाक, कपाळ, काख ह्याठिकाणी घाम आला की व्यायाम करणे थांबवावे.साधारण 20-30 मिनिटांच्या वेगाच्या व्यायामानंतर ही अवस्था येते.त्यापेक्षा जास्त शरीराला ताणायचे असल्यास त्याला सुयोग्य असा वेगळा आहार घ्यावा लागतो नाहीतर वातवृद्धी होण्याची शक्यता असते. व्यायामाला जाण्याआधी हलकेसे काहीतरी खाऊन जावे.थंडीत अग्नी प्रज्वलित असल्याने भुके पोटी व्यायाम केल्यास शरीरधातूंचा क्षय व्हायची शक्यता असते. व्यायामावरून आल्यावर भरपेट न्याहरी करावी.

साधारण मध्ये 1 तास वेळ जाऊ द्यावा.सर्व अंगाला कोमट तीळ तेलाने मालिश करावे.अंघोळ ही गरम पाण्यानेच करावी.साबण न वापरता चंदन, नागरमोथा, अनंता इत्यादी द्रव्यांनी बनवलेले उटणे वापरावे.त्वचेवरचे तेल अगदी घासून घासून काढू नये.त्वचा कोरडी होते. थंडीमध्ये जास्तीतजास्त गरम वातावरणात राहायचा प्रयत्न करावा.घरामध्ये घमेल्यात छानपैकी निखारे ठेवावे.थंडीमध्ये सर्वांची प्रकृती साधारण उत्तम असते.वयस्कर व्यक्ती व एकदम लहान मुले ह्यांना त्रास होऊ शकतो. त्यांना आवर्जून अभ्यंग करावा. हातापायात मोजे आणि वेळेवर भरपूर झोप घेऊ द्यावी.

कुठल्याही पद्धतीची प्रतिकारशक्ती वाढवायची औषधे, वजनवाढीची औषधे घेण्यासाठी एकदम सुयोग्य ऋतू आहे.

सर्वानाच प्रकृतीपूर्ण थंडीसाठी शुभेच्छा.

©️वैद्य स्वराली शेंडये

यशप्रभा आयुर्वेद

Disclaimer: This information is for informational purposes only. It is not meant as a  substitute for the advice of a Doctor or other health care professional. You should not use this information for self diagnosis or treating a medical condition 

Upcoming Events