नाट्यवेध एकांकिका विशेष – FB Posts

दोन वर्षांच्या प्रतिक्षे नंतर पुन्हा एकदा कलाकारांना रंगमंचावर आपली कला रसिक प्रेकक्षकांसमोर सदरकरण्याची संधी मिळाली आणि प्प्रेक्षकांच्या प्रतिसादाने प्रयोग “हाऊस फुल” झाला.हा प्रवास खूप वेगळा होता. नाटकाचं वाचन ऑनलाइन झालं कारण Covid restrictions. १७ कलाकारांना घेऊन एकांकिका बसवणं, त्यातले निम्मे कलाकार पहिल्यांदाच नाटकात काम करत होते, त्यात दोन एकांकिकांच दिग्दर्शन आणि मुख्य भुमिका ही सगळी तारेवरची कसरत एकाच वेळी करण्याची जबाबदारी सचिन आणि योगेश यांनी घेतली. सगळ्यांना समजून घेत अभिनयाची मुळाक्षर नाही तर हात धरून रेषा काढण्यापासून सुरूवात केली. तालीम सुरू झाली आणि टीममध्ये कोवीडचा प्रसार झाला आणि पुन्हा दोन आठवडे तालीम थांबली असं करत जेमतेम एक महिना तालमीला मिळाला. पण दोन्ही दिग्दर्शकांनी सगळ्यांना सामावून, समजून घेत प्रत्येकाला वेळ देवून तयारी करून घेतली. त्यात भर म्हणून काही जणांना भारतात जावं लागलं त्यात योगेश एक होता. दोन आठवडे भारतातून आणि ट्रान्झिट मध्येही प्रॅक्टीस साठी वेळ दिला त्याने. सचिन तर सगळीकडे च होता.पडद्यामागील कलाकारांनी नेहमी प्रमाणेच आधी आणि नंतर जी मेहनत केलीय त्यासाठी शब्दच नाहीत. भुषण, नितीन आणि टीम त्यात त्यांची कुटुंब ही आलीच हॅट्स ऑफ टू यू .संज्योत मेकपसाठी तुझा हात कुणी घरू शकत नाही.तनयानी ऐनवेळी मेकअपला आम्हाला केलेली मदत बघून आई म्हणून मला काल तुझा खूप अभिमान वाटला. मानसी नेहमी प्रमाणेच “मी आहे” विषय संपला.यावर्षीच्या मासी कमिटीबद्दल काय बोलावं? हौशी कलाकारांना प्रोत्साहन आणि पाठिंबा कसा द्यावा याचा नविन पायंडा त्यांनी घातलाय. असं पाठबळ जर हौशी कलाकारांना मिळालं तर आपल्या कलाकारांना आणि कार्यक्रमांना भारतातून आमंत्रण येण्याचा दिवस फार लांब नाही. तुमचं कौतुक करावं तेवढं थोडॅ आहे.जाणकार प्रेक्षक असतील तर कलाकारांना कला सादर करताना जास्त आनंद मिळतो.कालचा प्रयोग माझ्यासाठी अजून विशेष ठरला कारण “हाऊसफुल” ची पाटी लागलेला हा तिसरा अनुभव होता जो कोणत्याही कलाकारासाठी खूप आनंद देणारा असतो.आमची टीम म्हणजे मिक्स अँड मॅच होती. अगदी मुलाबाळांना घेवुन रात्री १ वाजेपर्यंत प्रॅक्टीस केलीय काही जणांनी. मुलांना नकळत नाटकाचं बाळकडू मिळाले.या प्रवासात मैत्रीचे नवे बंध जुळले आणि जूने घट्ट झाले. कार्यक्रमाच खरं यश हेच असतं नाही का?

Facebook Post: नीलिमा बेर्डे


तब्बल एक दशकभरानंतर जिवंत नाटक पाहायचा योग आला. २०१७ मध्ये उच्च-पदवी शिक्षण सुरु करताना शशी काकांनी मासी-ची (मराठी अससोसिएशन सिडनी इन्कॉर्पोरेटेड MAASI) तोंडओळख करून दिली होती. तेव्हापासून जाऊ-बघू-करू या समीकरणाने या ना त्या कारणांनी मासी चे कार्यक्रम चुकले-निसटले. पुढे शिक्षण आटोपल्यावर कामानिमित्त मी यंग -गावी स्थलांतरित झालो आणि सिडनीसोबत सम्पर्क तुटला. त्यात आधीच उल्हास आणि वर फाल्गुन मास या युक्तीने कोविड ने सारंच मुसळ केरात पाठवलं. सिडनी मराठी मंडळाच्या उत्साही कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सादर केलेले दोन- एकअंकी प्रयोग: “खास आपल्यासाठी” आणि “नुपूरी” पाहण्याची सुवर्णसंधी मला मिळाली. निव्वळ नशिबाने आणि मी थोडा माझा आळशीपणा बाजूला सारून कि बोर्ड वरच्या कळा दाबून तिकीट आरक्षित करण्याचे “गोवर्धन-पर्वत उचलण्याचे” कष्ट घेतल्याने दशक-भराच्या नाटक न पाहण्याच्या शापाला उ:शाप मिळाला. तसा माझा मुक्काम सिडनीच्या ऑपेरा हाऊस मध्ये पाश्चिमात्य मैफिलींमध्ये जास्त. परंतु अस्सल मराठमोळ्या मराठी कार्यक्रमाचा आस्वाद काही औरच असतो. पश्चिम सिडनी च्या वेन्टवर्थविल गावात रंगलेला छोटेखानी कार्यक्रम पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या आठवणी ताज्या करून गेला. तशीच गजबज, नोंदणीसाठीची रांग, तेच ओळखीचे नमस्कार चमत्कार, अस्सल देशी पेहराव केलेले प्रेक्षक आणि ओसंडून वाहणारा उत्साह. गेल्या ४ वर्षांत ऑस्ट्रेलियाच्या आंग्ल-भूमीत मराठी शिष्टाचार फारसे पाळले न गेल्याने मी जरा दबकूनच दालनात प्रवेश केला. कोणी ओळखीचा चेहेरा दिसतोय का याचा शोध सुरु केला. मी अगदी पडदा उघडायच्या वेळेत पोहोचल्याने फार काही नमस्कार चमत्कारांच्या भानगडीत पडलो नाही. माझी चूक नव्हती. पुण्यात रस्त्यांची कामे आणि सिडनीत रेल्वे-दुरुस्ती ची कामे जन्मो-जन्म चालतात, त्यामुळे थोडा उशीर झाला. एक तर नाटक दुपारी सुरु होणार होतं. आणि ते पुण्याच्या (१ ते ४ बंद) समीकरणात बसत नाही. तरीही आयोजक-प्रायोजकांवर “थोर उपकार” करायचे म्हणून मी उपस्थिती लावली. (हा एक फुटकळ विनोद होता. लगेच Sensitivity-Empathy च्या workshop ला मला बसवू नका). असो. पुढे मध्यंतरात चहा-कॉफी घेताना अनेक मान्यवर आणि ओळखीच्या लोकांसोबत गाठी-भेटी झाल्या आणि पुन्हा स्वगृही परतल्याची अनुभूती मिळाली. नाटक मात्र झकास झालं बाकी. उत्तम लेखन, दिग्दर्शन, अभिनय, संवाद, नेपथ्य, संगीत आणि रोषणाई चा अनोखा मिलाप दोन्ही प्रयोगात अगदी ठासून भरलेला होता. पट्टी-ची तयारी केली होती सगळ्यांनी. आता माझ्यासाठी हा केवळ तीन-एक तासांचा कार्यक्रम होता. परंतु इतका मोठा कार्यक्रम आयोजित करणं, त्यासाठी सगळ्यांची मोट बांधणं, कलाकारांनी आपल्या व्यस्त कामकाजातून वेळ काढून संवाद पाठ करणं, तालमींना सिडनीच्या वेगवेगळ्या टोकांहून येणं, त्याचं सूत्रसंचालन लीलया करणं, लोकांपर्यंत हे सगळं पोहोचवणं सोपं नाही. म्हणूनच मंडळ, मंडळाचे कार्यकर्ते, आयोजक, प्रायोजक, निमंत्रक, कलाकार आणि प्रबंधक या सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार आणि खास कौतुक.

Facebook Post: अमेय एकबोटे

Upcoming Events