yashaprabhaayurveda #misconceptionsexplained
मल्टी – व्हिटॅमिन आणि सप्लिमेंटस्: समज गैरसमज
एक रुग्ण बऱ्याच वेगवेगळ्या तक्रारी घेऊन आला होता. कोरोना पार्श्वभूमीवर ह्यांनी ह्या गोळ्या सांगितलेल्या, त्यांनी त्या, प्लस भूक लागत नाही म्हणून माझ्या डॉक्टरांनी पूर्वी अमुक ढमुक गोळ्या दिलेल्या अशा ३-४ मल्टी व्हिटॅमिन ची यादी समोर ठेवली. परीक्षणानंतर व्हिटॅमिन बी१२ हे प्रमाणाबाहेर वाढलेले आणि व्हिटॅमिन डी सुद्धा वरील पातळीच्या जवळपास होते हे कळले. शाकाहारी आणि व्हिटॅमिन B १२ कमतरता हे समीकरण इतके पक्के डोक्यात बसले असते की त्यामुळे त्या पातळीकडे लक्ष ठेवण्याकडे बरेचदा कानाडोळा केला जातो. शेवटी वैद्यकीय सल्ल्याने सर्व च्या सर्व व्हिटॅमिन बंद केल्या. ह्या सगळ्या प्रक्रियेत ते औषध सांगणाऱ्या डॉक्टरचा खरे तर दोष नसतो. लोप पावत चाललेल्या ‘ फॅमिली डॉक्टर ‘ संकल्पनेचा हा साईड इफेक्ट आहे..तसेच मीडिया मुळे “व्हिटॅमिन=स्वास्थ्य” हे समीकरण जोपर्यंत आपण डोक्यातून काढत नाही हे होतच राहणार.
एका डॉक्टर कडे एक रुग्ण गेला की त्याला ‘क’ गोळी दिली जाते. व्हिटॅमिनच आहे काय वाईट होईल असा विचार करून तो ती घेतच राहतो. मग दुसऱ्या स्पेशालिस्ट कडे दुसऱ्या त्रासा साठी जातो तेव्हा ह्या गोळीबद्दल सांगतोच असे नाही. मग एक ‘ख’ गोळी झिंक युक्त, ‘ग’ गोळीमध्ये Vit B12 जास्त आहे म्हणून, प्रतिकारशक्ती साठी Vit C ची ‘क्ष’ गोळी, सांधे दुखत आहेत म्हणून Vit D ची ‘ज्ञ’ गोळी अशा बऱ्याच अक्षरांच्या बाराखडीएवढ्या गोळ्या घेतच राहतो. एक मित्राची, एक शेजाऱ्यांची, एक सोशल मीडिया वरची, एक जाहिरातीतील आणि मग डॉक्टरांनी सांगितलेली एखादी असे चक्र सुरू राहते.
ह्यातील B complex आणि C हे पाण्यात विरघळणारे असल्याने शरीरातून बाहेर तरी टाकले जातात. B12 ह्याला थोडासा अपवाद आहे. ते पाण्यात विरघळणारे असले तरी त्याचा आकार मोठा असल्याने ते शरीरातून पटकन बाहेर जात नाही व यकृतात साठवले जाते. त्यात यकृत आजारी/अशक्त असेल तर ते बाहेर टाकायला अजुनच त्रास होतो.
(https://medlineplus.gov/ency/article/002403.htm)
वेगवेगळ्या गोळ्यांतून जर हे पोटात जायला लागले तर त्याचे त्रास होणार हे निश्चित. Vit A आणि Vit D हे पण तसेच. ते चरबी मध्ये साठवले जाते, व ‘hypervitaminosis’ नावाच्या लक्षणांचा समुच्चय दाखवते.
मग तुम्ही काय करायचे?
१. कुठल्याही नवीन डॉक्टरांकडे/वैद्यांकडे जाताना ‘supplements’ आणि ‘immune booster’ ह्या नावाखाली तुम्ही जे जे घेत असाल ते सांगा. sea weed पिल्स असतील, अजून काही प्रोटीन पावडर,च्यवनप्राश (किती, कसा, केव्हा, कोणाचा, कधीपासून), multivitamin (नावासकट, प्रत्येक गोळीचे घटक वेगळे किंवा समान असतात) , मेडिकल वाल्याने सांगितलेल्या अशा सगळ्या गोळ्यांच्या फराळाची लिस्ट वैद्य/डॉक्टर ला सांगा.
२. न विचारता A,D,E व्हिटॅमिन गोळ्या घेऊ नका. B कॉम्प्लेक्स हे धान्य व डाळीत भरपूर असते पचनच नीट नसल्याने त्रास होत असेल तर सल्ला घ्या व काही ठराविक काळ लागलीच तर ह्या गोळ्यांची मदत घ्या.
३. कमतरतेसाठी गोळी घेत असाल तर परत टेस्ट करून नक्की पहा. व्हिटॅमिन ने काय त्रास होणार असा विचार करून गोळ्या घेत राहू नका.
४. जाहिराती मुळे, मित्रांना, मैत्रीणीना मदत करायला, त्यांच्या चेन मार्केटिंग मध्ये भाग घ्यायला आणि मग विकत घेतल्याच आहेत तर खाऊ अशा पद्धतीत तर कधीच काहीच खाऊ नका. जे तुम्ही खात/घेत आहात ते वैद्यकिय सल्ल्यानेच घ्या. त्यातील घटक पहा, ते मित्र/मैत्रीण ह्यांनाही माहित नसेल तर काहीही तोंडात घालू नका. त्यांना प्रश्न विचारायला घाबरु नका.
५. खाणे नीट होत नाही म्हणून गोळ्या घेतो असे उथळ विधान इथे लागू होत नाही. भूक न लागणे, जेवण न जाणे, ते न पचणे हे अनैसर्गिक आहे.त्याची कारणं मीमांसा शोधा, सापडत नसेल तर तज्ज्ञांना भेटा. शरीराला ‘अन्न’ लागते ‘औषध’ नाही. ‘काय फरक पडतो?’ हे वाक्य विसरा. सिंथेटिक, natural, हर्बल, supplementary असे काहीही हे औषध असते हे ध्यानी असू दे.
ह्या गोळ्या तुमची मदत आहेत अन्न नाहीत. ह्या सगळ्या दिनचर्येत व्यायामाला विसरू नका. व्यायाम हा तुमच्या पचन आणि प्रतिकारशक्ती च्या बऱ्याच तक्रारी दूर ठेवेल. साधी सोपी भारतीय दिनचर्या सकाळी लवकर उठणे रात्री लवकर झोपणे, जिथे असाल तिथलाच आहार खाणे ह्याही काही साध्या सोप्या गोष्टी आहेत. त्यातूनही जर काही झाले तर डॉक्टर/वैद्य मदतीला आहेतच. ‘Being vigilant’ म्हणजेच आयुर्वेदाच्या भाषेत ज्ञापक असणे हे महत्त्वाचे.
©️वैद्य स्वराली शेंडये | e: swarali22@gmail.com | m: +91814893925
Disclaimer: This information is for informational purposes only. It is not meant as a substitute for the advice of a Doctor or other health care professional. You should not use this information for self diagnosis or treating a medical condition