आरोग्य संपदा – भाग 4

स्वयंपाकघर औषधी: ताक

ताकाची महती ही काही नवीन नाही. अपचन असो, भूक कमी लागो, पोट डब्ब होवो, घरातले ज्येष्ठ नेहमी सांगायचे, आले हिंग लावून ताक पी म्हणजे त्रास कमी होईल. 

ताक हे पचनावर उत्तम कार्य करताना दिसते. पण हे अतिशय उपयुक्त ताक सुद्धा ऋतू, प्रकृती, वय ह्याचा विचार न करता पीत बसले तर त्रास होताना दिसतो. कुठलाही पदार्थ असला अगदी अमृत असले तरी सुद्धा तरीही मनुष्यप्राण्याच्या पोटाच्या काही मर्यादा आहेतच.

ताकाबद्दल तर खूपच समज गैरसमज आहेत. महत्त्वाचा मुद्दा हा की दही आणि ताक हे समान नाही. मी ताकाऐवजी दही खातो हा युक्तिवाद होऊ शकत नाही. त्यांच्या करण्यात फरक आहे, दिसण्यात फरक आहे आणि गुणांमध्ये सुद्धा फरक आहे. त्यामुळे एक वाटी दही आणि एक वाटी ताक हे वेगवेगळे परिणाम दाखवतात. ताकाची आधी उपयुक्तता बघुयात.ताक हे पचायला हलके, पचनाला चांगले, पचनशक्ती वाढायला उपयोगी आहे. 

ताक हे नेहमी पूर्ण लागलेल्या दह्यापासून रवीनेच घुसळून केलेले असावे. अधमुऱ्या दह्याचे ताक नको. बिनसायीच्या दह्याचे ताक पचनाला हलके आणि चरबी कमी करणारे असते. सायीसकटच्या दह्याचे ताक पचायला जड असते.ताक घालून केलेल्या पालक, चाकवत इत्यादी भाज्या पचायला हलक्या व पथ्याच्या असतात. जुने शिळे,आंबट ताक किंवा त्याची कढी ह्याचे गुण वेगळे असतील हे लक्षात ठेवावे.

वयस्कर व्यक्तींना, आजारातून बरे होणाऱ्या, ज्यांना वजन कमी करायचे आहे अशा व्यक्तींना भाकरी आणि ताकातली भाजी देऊ शकतो. जेवणाआधी एखादा ग्लास ताक, जिरे, मिरे पूड टाकून प्यायल्याने शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी व्हायला मदत होते. दुखणारी मूळव्याध, पचनाच्या तक्रारी, ग्रहणी विकार ह्यांच्यासाठी ताक पथ्याचे आहे. स्थूल माणसांनी अवश्य जेवणात ताक प्यावे. 

पचनासाठी, पचायला हलके, अग्निवर्धक आणि जडपणा कमी करणारे असे ताक हवे असेल तर दही हे विना सायीचे, ताजे विरजलेले, अर्धवट न विराजलेले, ४-५ पट पाणी टाकलेले असावे. घुसळताना १०० वेळा घुसळावे. रवीनेच घुसळावे, घड्याळाच्या काट्याच्या आणि विरुद्ध दिशेने घुसळावे.

किडकिडीत, कोरड्या प्रकृतीच्या लोकांनी दुपारी 

सायीसकटच्या गोड ताज्या दह्याचे ताक प्यायला हरकत नाही.

जास्त तेलकट तळकट खाऊन झालेले अजीर्ण ताकाने कमी व्हायला मदत होते.जेवणानंतर पोट जड होत असेल तर जेवण प्रमाण थोडे कमी करून ताकाचे प्रमाण वाढवावे. ताक चांगले आणि पचायला हलके असले तरी जेवणामध्ये 1 ते 2 वाटी ताक पुरे. त्यापेक्षा जास्त घेतले तर त्याचाही त्रास होतो व  त्याने पण पोट डब्ब होऊ शकते.

पावसाळ्यात आणि हिवाळ्यात थोडेसे आले आणि मिरे पावडर टाकून ताक पिता येईल. उन्हाळ्यात प्यायला थंड वाटले तरी ताक कमी प्यावे कारण ते स्वभावाने रुक्ष आहे त्यामुळे शरीरात कोरडेपणा वाढवू शकते .साधारण ज्यांच्या दिनक्रमात जास्त जागरण, जास्त चालणे जास्त व्यायाम असतो त्यांनी ताक प्रमाणातच घ्यावे.बोलण्याचे भरपूर काम असणारे लोक जसे गायक, शिक्षक, वक्ता ह्यांनी पण ताक प्रमाणात प्यावे(दिवसाला 1 वाटी) आणि रात्री ताक पिणे टाळावे. 

कफाचा त्रास, वारंवार होणारी सर्दी, घास खवखवणे असे त्रास असता ताक पूर्णपणे वर्ज्य करावे. सर्वसामान्यांनी ठीक प्रकृति व विशेष त्रास नसता आवर्जून दुपारी तरी एक वाटी ताक नक्की प्यावे.

©️वैद्य स्वराली शेंडये | e: swarali22@gmail.com | m: +91814893925


यशप्रभा आयुर्वेद

Disclaimer: This information is for informational purposes only. It is not meant as a  substitute for the advice of a Doctor or other health care professional. You should not use this information for self diagnosis or treating a medical condition

Upcoming Events