दातांचे आरोग्य

पूर्वीची विको वज्रदंती ची जाहिरात आठवतीये?एक आजोबा त्यांच्या दाताने ऊस खातात, आक्रोड तोडतात. आज कोणाला ऊस तोडायला सांगितला तर कदाचित त्यांची दातांची कॅप निघून येईल. हल्ली दातासाठी replacement आणि early short term इफेक्टचे उपाय खूप निघाले आहेत. पुढील वाक्ये घराघरात सर्रास ऐकू येतात:

“दात सळसळ करत आहेत? sensitve टूथपेस्ट लावा.”
“तोंडाला वास येतोय? माऊथ वॉश आहे ना.”
“दातात खूप plaque जमते? सारखे खसाखसा ब्रश करा.”
“दात खराब झाला बदलून टाकू.”
“सारखा दुखतोय काढून टाकतो.”

आणि अशा सगळ्या त्रासांवर उत्तर आहेच. प्रत्येक गोष्टीला replacement उपलब्ध. (Cosmetic, asthetic आणि अत्यंत आवश्यकता असताना त्याची गरज सोडून.)

पण असे वाटते ह्या जाहिरातीत दाखवलेल्या ‘सोप्या’ उपायांनी लोकांनी मुद्दाम दाताच्या साठी वेगळी काळजी घेणे बंद केले आहे. आयुर्वेदात दाताची प्रकृति नीट राहावी म्हणून दिनचर्येत अतिशय सुंदर उपक्रम आले आहेत. ते पुढे सांगते.

पूर्वीपेक्षा दाताचे प्रॉब्लेम्स का बरे वाढले आहेत एवढे असा कोणी विचार करते का?हल्ली प्रेग्नंट असल्यापासून शेवटपर्यंत कॅल्शियम घेतात, दूध पितात, मुलांना अजिबात गोळ्या चॉकलेट देत नाहीत तरी दोन अडीच वर्षाला कीड मुलांचे दात खायला सुरुवात करते. ह्या सगळ्यात अजून जास्त preventive विचार करणे खूप गरजेचे आहे
आणि फक्त ब्रश आणि फ्लॉस नाही, आयुर्वेदात सांगितलेले दिनचर्येत आलेले उपक्रम नियमाने करणे पण.

साधारण दाताची प्रकृति खालील काही गोष्टींनी बिघडू शकते:

  • दाताची मूळ प्रकृती : ह्यामध्ये आपण बदल नाही करू शकत.
  • आहार : सतत कोल्ड ड्रिंक्स, गोड खाऊन दात साफ न करणे, हाडांना बळकट करण्याचा आहार कमी असणे, आंबट खारट सारखे खाणे किंवा वात वाढवणारा आणि पित्तकर आहार विहार. खाण्यात खारे काजू, खारे दाणे, फरसाण, लोणची, पापड ह्यांचा अती वापर हे काही पदार्थ येतात. नियमाने आंबट रस जास्त प्रमाणात: काही लोकांना रोज भरपूर लिंबू पिळून पाणी, ऍपल सायडर व्हिनेगर घ्यायची सवय असते.
  • सवयी: तंबाखू, सिगरेट, सतत मद्यपान, पान सुपारी, मशेरी(खरखरीत असल्याने इजा पोचते)
  • विहार:जागरण, काही सवयी: गार पाण्यावर चहा, चहावर गार पाणी, चहा नंतर लगेच गार पाण्याची चूळ, फळे चावून न खाणे
  • जोरजोरात सारखे दात घासणे: दातातील नसा नीट ठेवणारा बाह्य स्तर ह्यामुळे झिजतो व दाताला स्पर्श सहन होईनासा होतो (सेन्सिटिव्ह टीथ)
  • कृमी: लहान मुलांमध्ये सतत जंत होत असतील तर त्यांना सतत गोड खाण्याची इच्छा होते व दातात कीड होऊन ते लवकर खराब होतात.
  • आजार: जुनाट आम्लपित्त, प्रमेह
  • ह्यात बरेचदा दुर्लक्षित केले जाते ते जुनाट आम्लपित्त. वर्षानुवर्षे acidity असणाऱ्या लोकांच्या तोंडाला एक विशिष्ट वास येतो तसेच तोंडात एक कडवट चव असते. त्यांच्या तोंडात सतत पित्त असल्याने त्याच्या उष्णतेने व क्षरण करण्याच्या गुणाने ते दात झिजवते. पिवळसर करते. अशा लोकांनी कितीही ब्रश केला तरी पिवळेपणा कमी होत नाही. ह्याच जुनाट पित्ताने एक बाजूचे तोंड दुखणे, हिरडी दुखणे, दात सळसळणे ही लक्षणे दिसतात. अशा रुग्णात पित्त कमी करणाऱ्या औषधांनी हमखास बरे वाटते. पण दाताची आधीच जी झीज झालेली असते ती भरून येणे मात्र जवळ जवळ अशक्यच. प्रमेह रुग्णात “मल जास्त तयार होणे” हे लक्षण आले आहे. त्यामुळे सतत दातात पटकन मल तयार होऊन ते खराब होण्याचा वेग वाढतो.

आयुर्वेद दिनचर्येत दातांच्या मजबुतीसाठी काय उपाय सांगितले आहेत?


१. दंत धावन: कडू रसाने दात घासणे अपेक्षित आहे. कडुनिंबाच्या काडीने पूर्वी दात घासत. आता ते शक्य नसले तर किमान दाताची पावडर लावून मग ब्रश ने हिरड्यांना धक्का न लावता दात घासावेत. साधारण कडू, तुरट किंवा तिखट चवीचे दंतमंजन लावावे. हे रस तोंड साफ करणारे आणि पित्त कमी करणारे आहेत. ते लाळेतील चिकटपणा कमी करतो आणि तोंडाचा दुर्गंध देखील.
२. कवल/गंडूष: तोंडात २ चमचे तेल धरून ते फिरवावे. खोलात वाचण्यासाठी ही लिंक वाचा:
३. नस्य: नियमाने नाकात औषधी तेल घालणे हे खांद्यावरील सगळ्या भागांना बळकटी देणारे असते. मुख्यतः वय झाल्याने जे त्रास होतात उदा.केस गळणे, पांढरे होणे, ज्ञानेंद्रिय कमजोर होणे, दात अशक्त होणे- झिजणे- दुखणे हे कमी होतात किंवा त्यांचा वेग खूप मंदावतो. ह्याबद्दल जवळच्या वैदयाकडून जाणून घेऊ शकता.
४. वरती जे आहार विहार दाताच्या त्रासाची कारणे म्हणून सांगितले आहेत ते टाळणे.
५. काही आयुर्वेदिक औषधे ही दुधाचे दात पडून नवीन दात उत्तम यावेत म्हणून मदत करतात. वेदना शमन, हिरड्यांचे विकार ह्यासाठी काही उपक्रम खूप मदत करतात. हिरड्यांचे आजार वेळीच तपासले तर पुढेपर्यंत त्रास होत नाही.

आम्लपित्त, अपचन ह्याने होणारे शरीरावरील परिणाम दात खराब करतात. हे दात तुम्ही एकवेळ बदलू शकता पण ते खर्चिकही असते आणि छोट्या कालावधीसाठी काम करणारे. त्यातून त्याला मूळ दाताची सर कशी येणार? म्हणूनच वेळीच सर्व बाजूंनी दाताची काळजी घेऊया आणि ह्या मोठ्या कंपन्यांच्या महागड्या प्रॉडक्ट्सने बाथरूम चे कप्पे भरणे बंद करूया. मोदींनी सांगितलेली ‘Vocal for Local’ आणि आत्मनिर्भरता ह्याची सुरुवात ही आयुर्वेदाच्या दिनचर्येपासून करूया.


©️वैद्य स्वराली शेंड्ये, वैद्य प्रभाकर शेंड्ये

e: swarali22@gmail.com, m: +91814893925
यशप्रभा आयुर्वेद

Disclaimer: This information is for informational purposes only. It is not meant as a  substitute for the advice of a Doctor or other health care professional. You should not use this information for self diagnosis or treating a medical condition

Upcoming Events