अप्रतिम! दर्जेदार!! अतिउतकृष्ट!!!……
आसंच वर्णन नुकत्याच, म्हणजे २२ एप्रिल २०२३ रोजी सिडनी ऑस्ट्रेलियामधील यूएनयेसडब्लूच्या सायन्स थिएटर मधे सादर झालेल्या मराठी असोसिएशन सिडनी (मासी) निर्मित ‘चियर्स टू लाइफ’ या नाटकाच्या प्रयोगाचं करावं लागेल…..
मूळ सुशांत खोपकर लिखित या नाटकाचा सिडनीतील पहिला नी एकमेव प्रयोग सिडनी येथील लोकल मराठी कलाकारांनी फक्त यशस्वीच केला नाही, तर अक्षरशः सुपरहिट केला. दर्जेदार लेखनाला अत्युच्च दिग्दर्शन आणि कसदार अभिनयाची जोड मिळाल्यामुळे प्रयोग डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला. प्रेक्षकांचा हशा, टाळ्या, शिट्ट्या आणि प्रसंगी हुंदके या सगळयांनी त्या प्रेक्षगृहातल्या निर्जीव भिंती नी खुर्च्यादेखील जणू म्हणाल्या…..’चियर्स टू लाइफ’…….
मराठी असोसिएशन सिडनी (मासी) आयोजित या प्रयोगाला सुपरडूपरहिट बनवण्याचं श्रेय जाते ते नरेंद्र अंतुरकर आणि योगेश पोफळे या दिग्ददर्शी जोडगोळीला आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या अथक मेहनतीला. घर गृहस्ती नी कामकाज सांभाळत केलेल्या या प्रयत्नाचं खऱ्या अर्थाने या सर्वच कलाकारांनी चीज केलं आसं म्हटलं तर ते अजिबात वावगं ठरणार नाही. “आपलेच लोक आहेत, घेतील की एडजस्ट करुन”….. हा सर्वप्रचलित नियमच जणू काही या टीम ने सर्वप्रथम खोडून टाकलेला दिसतोय. कारण अचुकतेच्या बाबतीत कुठेही कोम्प्रोमाईज़ केलेलं नाही. प्रेक्षक म्हणून पाहताना, हे सर्व कलाकार आपल्या नेहमीच्या बोलण्या चालण्यातले आहेत हा संपूर्ण विसर मला तरी प्रयोग संपेपर्यंत पडला होता. ‘परफेक्शन’ ज्याला म्हणतात ते हेच, नाही का?
नाटका बाबतच बोलायचं झालं तर एका मध्यमवर्गीय चौकोनी कुटुंबात सगळं काही अलबेल असताना अचानक नियती घाला घालते आणि मग ते ‘हैप्पी गो लकी’ कुटुंब अक्षरशः दुःखाच्या दरीत कोसळतं. पुढे मग त्या कुटूंबाचा ‘कॅप्टन’ अर्थात त्या कुटूंबातील गृहिणी पुन्हा त्या कुटुंबाला दुःखाच्या दरीतून सुखांच्या डोंगरावर चढण्याचा मार्ग दाखवते. असा उत्कृष्ट आशय असलेलं हे नवं कोरं दोन अंकी नाटक लिखाणाच्या बाबतीत दर्जेदार तर नक्कीच आहे, परंतु त्यातील प्रत्येक पात्रांचा नेमकाच पण पुरेपुर वापर करुन घेतल्यामुळे हे नाटक क्षणभरही रटाळ वाटत नाही. पूर्वार्धात एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटूंबातील दैनंदिन घडामोडींचा अचूक वेध घेतल्यामुळे हे कुटुंब प्रेक्षकांना आपलंस करुन घेतं ज्यामुळे उत्तरार्धात जेंव्हा हेच कुटूंब दुःखाच्या खायीत जातं तेंव्हा प्रेक्षकांनादेखिल या कुटुंबाची दुःख आपलीच दुःख वाटतात. हे नाटक सुरुवातीला घरगुती प्रसंगांतील कोपरखळयांतून प्रेक्षकांना हसवता हसवता शेवटी दुःखांच्या प्रसंगी रडवत आणि भावनांची जणू काही रोलर कोस्टरची राइड घडवतं.
अभिनयाच्या बाबतीत बोलायचं झालं तर सर्वच कलाकार आपआपल्या भूमिकेत अगदी चपखल आणि दर्जेदार. मग तो विध्नेष चांदोरकरने साकारलेला ‘ तेजस’ असो, किंवा मेघा सेवेकरीची ‘ईशा’ असो. जेवढा भावना झोपेची स्टाइलिश ‘पल्लवी’ भाव खावून जाते, तितकाच भाव प्रतीक्षा चुत्तार ‘सायलीच्या’ सरळ सोज्वळ भूमिकेत खावून जाते. एखाद्याला डोळे बंद करुन जर एखादयाने डॉ ओक या व्यक्तिरेखेच वर्णन केलं आणि त्यावरुन डॉ ओक यांच चित्रं काढायला सांगितलं तर त्याने काढलेलं चित्रं हे कदाचित रवीचंच असेल, इतक ते चपखल पात्र सिलेक्शन रवि अधिकारीच आहे.
नरेंद्र अंतुरकर आणि हेमांगी काळे या दोन्ही दिग्गजांनी आपापल्या भूमिकांमध्ये अक्षरशः जीव ओतलाय. कुटुंबावर नियती रूसते तेव्हा एक कर्ता पुरुष मोडून तर पडला आहेच पण कुटुंबाला आधार देण्याच कर्तव्य पण करत आहे या मधील संमिश्र भावनांची घालमेल नरेंद्र खूपच नैसर्गिकपणे दाखवतो, तर संपूर्ण नाटकाची मध्यवर्ती व्यक्तिरेखा असलेली रश्मीची भूमिका हेमांगीने अत्यंत समर्थपणे निभावलीय. तिच्या शेवटच्या सोलिलक्वीने तर सगळ्या प्रेक्षागृहालाच हुंदके आणि अश्रू आणले. स्तब्धता आणि निशब्दस्थिती हे त्या प्रसंगावेळी मी स्वतः आंतरबाह्य अनुभवलं.
मेघा, विघ्नेश आणि प्रतीक्षा हे नक्कीच उगवते तारे आहेत. मेघाने ईशाच्या व्यक्तिरेखेतील पूर्वार्धातील चुलबुली नी स्टुडिअस ईशा आणि उत्तरार्धातील सेंसिटिव नी गलितगात्र ईशा या दोन्ही छटा एखादया कसलेल्या कलाकाराप्रमाणे सहज प्रदर्शित केल्या तर विघ्नेश देखील सुरुवातीचा स्वच्छंदी तेजस आणि उत्तरार्धातला जबाबदार पण काहीसा हरवलेला तेजस दर्शविण्यात कुठेही कमी पडलेला नाही. खासाकारून या तीनही तरुणांनी ऑस्ट्रेलियातच जन्मुन इथेच लहानाचे मोठे झालेले असल्यामुळे मराठी त्यांची प्रथम भाषा नसतानादेखील ज्याप्रकारे अस्खलितपणे मराठी संवादफेक केलीय ते पाहून मराठी भाषा आणि मराठी रंगभूमीचा वारसा साता समुद्रापार आमच्या पिढीने नवीन पिढीला यशस्वीपणे दिलाय यात शंका तर वाटत नाहीच पण हा वारसा ही पुढची पिढी पुढे वृद्धिंगत करेल याची खात्रीही पटते.
बाकी प्रकाश नाईक आणि पराग रानडे यांचं पर्श्वसंगीत भावनांच्या हिंदोल्यावरील ही सैर आणखीनच परिणामकारी करत, तर आपलं पण घर असंच सजवलेलं असावं आसं पटकन वाटवं इतकं सुंदर नेपथ्य आणि रंगमंच सजावट भूषण करंदीकर, शिरीष रबडे, नितीन चौधरी, किशोर जोशी आणि विजय देशपांडे, अथर्व करंदीकर आणि किशोर गुरम या शिलेदारांनी केली आहे. सागर आगाशेची प्रकाशयोजनादेखिल या सर्वांवर कडी ठरते, तर संज्योत डोंगरेची ‘वन वुमन आर्मी’ नेहमीप्रमाणेच इथेही वेशभूषेसारखी अतिमहत्वाची कामगिरी लीलया पार पाडते. याशिवाय, शुभा अधिकारी, वर्षा चांदोरकर इत्यादिनी प्रयोगास केलेली खास मदत आणि या प्रयोगाच्या निम्मित्ताने आमच्या इतर सहकारी रसिक प्रेक्षकांशी झालेल्या स्नेहभेटी…..सगळं-सगळं काही निव्वळ अप्रतिम!!!
सरतेशेवटी, माझ्या या लेखप्रपंचाच्या बदल्यात टीम ‘चियर्स टू लाइफ’ ला एकच मागेन, “ पुढील प्रयोग कधी आणि कुठे?”
संतोष शेंडे
सिडनी ऑस्ट्रेलिया