बर्याच दिवसांनी नाही तर बर्याच महिन्यानंतर मासीचा एक कार्यक्रम नुकताच पार पडला. कार्यक्रमाबाबत विविध लोकांनी Social media वर बऱ्याच posts टाकल्या आणि त्यावर अनेक चांगल्या प्रतिक्रया सुद्धा दिल्या. कुणी प्रत्यक्ष कार्यक्रमासाठी, कुणी संयोजनासाठी तर कुणी निवेदनासाठी, जवळपास सर्वांनीच खूप कौतूक केले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून संयोजकांच्या चष्म्यातून…. असे कार्यक्रम घडण्यामागचा कार्यकारणभाव, त्यामागची समीकरणे याबाबत अगदी थोडक्यात.
वर्षाहून अधिक वेळ वाट बघितल्यानंतर, अनेक अडचणींवर मात करत, सुमारे पन्नासहून अधिक लोकांच्या सहभागाने आणि सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला. आपली कलाकृती सादर करण्याची ऊर्मी, कौतुकाच्या थापेमधून मिळणारी तृप्ती मिळवू पाहणारे कलाकार एकीकडे, तर उत्तम कलाकृतीस भरघोस दाद देणारे दर्दी प्रेक्षक, आपल्या माणसांना रंगमंचावर बघून भरून पावणारे पाठीराखे दुसरीकडे आणि या दोघांमध्ये त्यांना एकत्र आणणारे संयोजक. यापैकी यशाचा वाटा कुणाचा किती हे मोजायचे झाले तर बहुदा तिघांच्याही पदरात जवळपास सारखेच माप पडेल. एक मे रोजी संपन्न झालेला कार्यक्रम यशश्वी झाला असे ‘म्हंटले’ आणि कोणत्या एका गोष्टीला या यशाचे सर्वात जास्त श्रेय जाईल असा प्रश्न विचारला, तर कार्यक्रम पार पाडण्यात प्रत्येक घटकाचे योगदान किती महत्वाचे आहे, याचे इतरांनी ठेवलेले पुरेसे भान असे म्हणायला हरकत नसावी. सगळे परिपूर्ण होते असे नाही, नक्कीच काही त्रुटी राहिल्या असतील, वेळोवेळी मतभेदही, रागरुसवे सुद्धा झाले असतील, परंतू संपूर्ण प्रक्रियेत सर्व घटक एकमेकांचा कायम आदर करत राहिले हे महत्वाचे. असे जितके जास्त होत राहील तितके खूप काही सुंदर साध्य करता येईल आणि ते कुणा एकासाठी नसेल तर ते सर्वांसाठी असेल .
जाता जाता आणखी एका गोष्टीचा विशेष उल्लेख करावासा वाटतो. काही अपवाद (असल्यास) वगळता, कार्यक्रम सादर करणारे आणि संयोजक हे सर्व मासीचे सभासद होते. इतकेच नाही तर जवळपास 80 टक्के उपस्थित प्रेक्षक सुद्धा मासीचे सभासद होते. मासीसारख्या संस्थांसाठी काम करताना, आम्ही सभासद का व्हायचे? यात आम्हाला काय मिळणार? असे प्रश्न कायमच समोर येतात. त्याबाबत अगदी थोडक्यात सांगायचे झाले तर सभासद आहेत म्हणून मासी आहे आणि मासीचे एक अदृश्य पाठबळ आहे. यामुळेच असे उपक्रम हाती घ्यायचे, ते राबवायचे धाडस होऊ शकते. स्वयंस्फूर्तीने अणि स्वयंसेवेमधून होणार्या कामात आपल्याला यातून काय मिळते हे वर वर शोधून सापडणे तसे थोडे अवघड आहे परंतू स्वतः बरोबरच थोडा अधिक संवाद साधला आणि त्याचे सकारात्मक उत्तर सापडले तर जे सापडेल ते मात्र फार मोलाचे असेल.
मासी समिति 2022.