लहान मुले आणि च्यवनप्राश
सध्याच्या पार्श्वभूमीवर ठळक पणे ह्याबद्दल लिहावे असा विचार आला. Immunity booster, immunity kit हे शब्द आता आपल्याला नवीन नाहीत. प्रतिकारशक्ती म्हटलं की आयुर्वेद आणि मग आयुर्वेद प्रतिकारशक्ती म्हटले की च्यवनप्राश आणि गुळवेल हे प्रकर्षाने लोकांपर्यंत पोचले आहे पण अर्धवट ज्ञान ह्या स्वरूपात. सध्या तिसरी लाट आणि मुले हा सर्वांचा हॉट फेवरेट विषय असल्याने लोकांकडून च्यवनप्राशची विचारणा सुद्धा खूप होते.
परंतु पूर्ण माहिती नसताना च्यवनप्राश घेत राहणे हे चक्रव्यूहात घुसलेल्या अभिमन्यू सारखे आहे. च्यवनप्राश हे एक रसायन म्हणजे शरीरातील दोष योग्य पातळीवर असताना आणि रोग नसताना शरीर उत्तम करण्यासाठी घ्यायचे औषध आहे. सध्याच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर रोग असताना आणि गेल्यावर बरेच लोक OTC हे औषध घेऊन खातात. इथे लक्षात हे घ्यायला हवे की च्यवनप्राश ही एक अवलेह कल्पना आहे, थोडी जड स्वभावाची. त्यामुळे आजारातून नुकतेच उठल्यावर भूक ताळ्यावर आली नसताना लगेच मोठ्या मात्रेत च्यवनप्राश खाऊ नये. अग्निमांद्य असल्यास वैद्यकीय सल्ल्याने अग्नी वर्धक कल्प, आसव अरिष्ट, आणि मग काही औषधी मिश्रण बरोबर मग च्यवनप्राश असा साधारण क्रम असतो.
मुलांना सर्दी खोकला ताप असताना तो रोग कमी करण्यासाठी च्यवनप्राश देऊ नये. च्यवनप्राश हे औषधी काढे, तूप, मध आणि आवळा ह्यांनी युक्त उत्तम प्रतीचे असे बलवर्धक औषध आहे. काही विशेष आजार परत परत होत असता आजारांच्या लाटांमध्ये पुढच्या लाटेची तीव्रता कमी करण्यासाठी किंवा परत आजार न होण्यासाठी हे औषधासोबत किंवा नुसते दिले जाते. आजार असताना किंवा शरीरात रोग असताना च्यवनप्राश घेणे हे मळक्या कपड्याला रंग देण्यासारखे आहे.
•च्यवनप्राश लहान मुलांना कधी द्यावा? वर सांगितलेले कुठलेही आजार नसताना सकाळी उठल्यावर पोट साफ झाल्यावर नाश्ता करण्याआधी वैद्यकीय सल्ल्याने साधारण वयाप्रमाणे १/४ चमचा ते १ चमचा ह्या मात्रेत द्यावा.
•च्यवनप्राश कधी देऊ नये? पोट साफ होत नसल्यास, सर्दीच्या पहिल्या किमान पाहिले ५-७ दिवस, खोकला आणि ताप असताना, भूक कमी असता, आहार कमी असता अजिबात देऊ नये. तुमचे वैद्य इतर काही पाचक औषधां बरोबर कमी मात्रेत द्यायला सांगू शकतील त्याप्रमाणे घ्यावे. •च्यवनप्राश कुठल्या कंपनीचा द्यावा? साधारणपणे वैद्याने स्वतः त्याच्या देखरेखीखाली बनवलेला दवाखान्यातील च्यवनप्राश घ्यावा.
•च्यवनप्राश वर गरम दूध द्यावे का? च्यवनप्राशवर दूध द्यायची गरज नाही. मुलांच्या पोटाला जड होऊ शकेल.गरम दूध हे च्यवनप्राश मधील मधाच्या आणि आवळ्याच्या विरुद्ध होईल. च्यवनप्राश खाऊन अर्धा तास काहीच खाऊ पिऊ नये. च्यवनप्राशचा मूळ घटक आवळा हा आंबट तुरट असल्याने दुधाबरोबर घेऊ नये. त्यानंतर भूक लागल्यावर खायला द्यावे.
•च्यवनप्राश चे फायदे काय आहेत? च्यवनप्राश हे एक सर्वांगसुंदर रसायन आहे. उत्तम बुद्धी, कांती आणि इंद्रिय बल ह्याच्या सेवनाने मिळते. लहान मुलांना उत्तम शरीर वृद्धी व संहनन देणारे आहे. आयुष्य कर म्हणजेच उत्तम प्रतीचे दीर्घायुष्य मिळायला ह्याच्या सेवनाने मदत मिळते. वरील पथ्ये व नियम लक्षात घेऊन मुलांना द्यायला काहीच हरकत नाही. चुकीच्या पद्धतीने चुकीच्या अवस्थेत दिले गेले तर उलटे परिणाम दिसू शकतील ही गोष्ट मात्र ध्यानात ठेवावी.
©️वैद्य स्वराली शेंडये | e: swarali22@gmail.com | m: +91814893925
Disclaimer: This information is for informational purposes only. It is not meant as a substitute for the advice of a Doctor or other health care professional. You should not use this information for self diagnosis or treating a medical condition