सर्वसाधारणपणे अग्नी ह्या शब्दाने,
- अन्नाचे पचन करायची ताकद
- एका स्वरूपातील शरीर धातू दुसऱ्या स्वरूपात बदलायची ताकद
- ज्या गोष्टी आत ठेवायच्या आहेत त्या योग्य ठिकाणी
- पोहोचवणे
- नको असणाऱ्या गोष्टी योग्य वेळी बाहेर टाकणे
- ह्या सगळ्या गोष्टी अभिप्रेत असतात. ह्यात अजून बरेच कंगोरे आणि बारकावे असतात पण ढोबळ मानाने:
- खूप भूक लागणे किंवा सतत पोटात आग पडल्यासारखे वाटणे हे उत्तम अग्नीचे लक्षण असेलच असे नाही. तात्पुरते वाढलेले पित्त सुद्धा ही लक्षणे दाखवते.
- व्यक्तिशः प्रत्येक व्यक्तीची पचवायची ताकद ही वेगळी असते. ती त्याच्या अग्निवर अवलंबून असते. ही ताकद तुम्ही थोडी फार औषधे व योग्य आहार विहार ह्यांच्या मदतीने वाढवू शकता.
- केव्हाही अग्नीच्या क्षमतेनुसार आहाराची मात्रा ठेवावी हे योग्य. एकाच वयाच्या, एका लिंगाच्या, समान शरीर आकार आणि वजन असणाऱ्या व्यक्तींपैकी एकाला १ पोळी लागु शकते तर एकाला दोन. हा त्यांच्या अग्नी मधला फरक आहे. प्रत्येक बदलाव किंवा transformation होताना अग्नी चा समावेश असतो.
जे तुम्ही खाता त्याचे प्रत्येक शरीराच्या अवयव व भाव पदार्थांमध्ये बदल होताना अग्नी कारणीभूत असतो.
एखाद्या स्थूल आणि कमी खाणाऱ्या, व्यायाम करणाऱ्या माणसाचे वजन जेव्हा कमी होत नाही तेव्हा बरेचदा मंद अग्नी किंवा त्याच्या आहार रसाचे योग्य भागात परिवर्तन न होणे हे कारण असते. जे काही तो/ती खातो ते सर्व मेदात रूपांतरित होते. अशा वेळी अग्नी वर्धक आहार विहार औषधांचा उत्तम फायदा दिसतो. थोडक्यात तुमचा अग्नी जितका चांगला तितके तुमचे शरीर स्वास्थ्य चांगले असे साधारण म्हणता येईल.
अग्नी मंद होण्याची सर्व साधारण कारणे काय?
१. सतत पचायला जड अन्न खाणे: तुमच्या पोटात एखादी चूल आहे असा विचार करा. चुलीतील निखारे नीट फुललेले नसताना जर एखादा लाकडाचा मोठा ढलपा तुम्ही त्या चुलीत टाकलात तर नक्कीच त्या अशक्त निखाऱ्यानी तो ढलपा पेट घेणे अवघड आहे. त्यावेळी तो ढलपा सावकाश बाहेर काढून आधीची राख साफ करून फुंकर मारून निखारे फुलवून मग कदाचित ते लाकूड तुकड्या तुकड्यांनी पेट घेऊ शकेल. अशाच पद्धतीने जड अन्न एकदम सतत पोटात ढकलत राहिल्यास अग्नी अजून अजून मंद होत जातो व पचनशक्ती अशक्त. असा मंदअग्नी पेटवायचे काम हे लंघनाने आणि औषधाने साध्य होते. तुमच्या अग्नीची ताकद नसताना, दिसायला हलके पण पचायला जड किंवा त्रासदायक असे ब्रेड, बिस्किटे, इडली, कच्च्या भाज्या सतत खात राहिले तर त्रास होताना दिसतो. जे लोक भरपूर व्यायाम करतात, ज्यांची मुळात अग्नी प्रकृति उत्तम असते, जे तरुण आहेत त्यांना साधारणपणे ह्या गोष्टी पचू शकतात, पण वय वाढेल तसे ह्या गोष्टींचे त्रास होतात आणि असे अपथ्य सतत केले असेल तर हे परिणाम अजून लवकर दिसतात. भूक कमी लागत असताना डायबेटिस ची गोळी खायची म्हणून खारी आणि चहा पितो किंवा ४ बिस्किटे खाऊन गोळी घेतो असे करू नये.
२. आधीचे पचायच्या आधी पुढचे अन्न खाणे: पातेल्यात शिजत ठेवलेल्या अर्धवट शिजलेल्या भातात नवीन तांदूळ घातले तर ते नीट शिजत नाहीत तसेच काहीसे पोटात होते. आधीचे अन्न आतड्यात पचनाच्या प्रक्रियेत असताना नवीन गोष्ट खाणे हे त्रासदायक. साधारण पूर्ण पचन व्हायला शारीरिक हालचाल व मूळ प्रकृति प्रमाणे ४-७ तास लागू शकतात. तेवढा वेळ दिला तर अन्नपचन नीट व्हायला मदत होईल.
३. जेवल्यावर लगेच व्यायाम/चालायला/कामाला जाणे: जेवण झाल्यावर थोडा वेळ बसणे योग्य. लगेच शारीरिक हालचाल केल्यास अन्न पचनाला अवघड जाते. (रात्री जेवण झाल्यावर चालायला जाणे इत्यादी). संधीवात, गांध्या येणे, खाज, सर्दी हे विकार होऊ शकतात.
४. सतत शिळे खाणे (फोडणीची पोळी/फोडणीचा भात), भूक नसताना खाणे, गरम आणि ताजे न खाणे ही कारणे सर्वांना साधारण माहित आहेच. ह्यामुळे रासायनिक क्रिया होऊन अग्निला त्रास होतो. कधीतरी, इलाज नसताना वगैरे खाणे ही वेगळी गोष्ट आहे.
५. जेवणाआधी किंवा नंतर भरपूर पाणी पिणे, फळे खाणे: पाचक रस मंद होत जातात आणि पचनशक्ती मंदावते. ढेकरा येणे, आम्लपित्त सारखे विकार बळावतात.
६. सकाळी उठल्या उठल्या खूप पाणी पिणे: हल्लीची साधारण उठायची वेळ ही ६ नंतर असते. ती कफाची वेळ असल्याने त्यात भरपूर पाणी मुद्दाम तहान लागलेली नसताना प्यायले गेले तर अग्नी ची ताकद मंदावणार हे नक्की.
७. अजिबात व्यायाम न करणे: योग्य प्रमाणात रोजच्या रोज केलेला व्यायाम हा अग्नी नीट ठेवायला मदत करतो. अजिबात व्यायाम न करणे हा काही काळाने चयापचय क्रिया मंदावत नेणार हे नक्की.
८. मानसिक कारण: जर क्रोध, शोक, दुःख असे काही मानसिक कारण असेल तर अग्नीची ताकद कमी होते आणि पथ्याने आणि प्रमाणात केलेले भोजन सुद्धा नीट पचत नाही.
९. खूप जास्त किंवा खूप कमी खाणे
ढोबळ मानाने वरील काही कारणे सामान्यतः सापडतात ती तरी टाळावी, म्हणजेच काही विकार झाला तरी शरीराची मूळ तब्येत चांगली असल्याने तो बरा होणे सोपे जाईल एवढे निश्चित.
©️वैद्य स्वराली शेंडये | e: swarali22@gmail.com | m: +91814893925
Disclaimer: This information is for informational purposes only. It is not meant as a substitute for the advice of a Doctor or other health care professional. You should not use this information for self diagnosis or treating a medical condition